সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, September 03, 2018

अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून जिल्हाभरातील विविध संस्थांची तपासणी

रुग्णालय, आश्रम शाळा, वसतिगृह, ग्रामपंचायतीला भेटी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यातील विविध आस्थापना योजना, उपाययोजना, यामध्ये राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे अनुसूचित जमाती संदर्भातील निर्देशित काम होते अथवा नाही याची तपासणी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज जिल्ह्यात केली. सोबतच काल दिवसभर घेतलेल्या बैठकांमध्ये उल्लेख झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी देखील रात्री उशिरापर्यंत दहा आमदारांची चमू करीत होती.राज्य शासनाची विशेष अधिकार असणारी 15 विधिमंडळ सदस्यांच्या सहभागातील अनुसूचित जमाती कल्याण समिती सध्या तीन दिवसांच्या चंद्रपूर दौऱ्यावर आहे. काल गुरुवारी या चमूने रात्री अकरा वाजेपर्यंत विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये तसेच जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये काल विविध विभागाचा आढावा या चमूने घेतला. राळेगाव मतदारसंघातील आमदार अशोक उईके हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये आमदार वैभव पिचड, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार पंकज भोयर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकूर, आमदार पास्कल धनारे, आमदार संतोष टारफे यांचा समावेश आहे. 
आज या 11 आमदारांच्या चमूला तीन भागात विभागणी करून आमदार अशोक उईके, आमदार वैभव पिचड, आमदार श्रीकांत देशपांडे या तीन आमदारांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या तीन भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता सकाळी 11 वाजता या चमू रवाना झाल्या. रात्री उशीरा पर्यंत जिल्ह्याच्या विविध भागात शाळा ग्रामपंचायती वसतिगृह तसेच विविध आस्थापनाची या आमदारांनी तपासणी केली. जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या न्याय्य हक्काचे संरक्षण होते अथवा नाही याबाबतची प्रत्यक्ष खात्री केली. काल दिवसभर झालेल्या अनेक बैठकांमध्ये विविध विभागांच्या विभाग प्रमुखांशी बोलतांना त्यांनी अनेक कामांबाबत विचारणा केली होती. या चर्चेदरम्यान काही कामांबाबत चौकशी करण्याबाबत या आमदारांनी तयारी दाखवली होती. आज सकाळी प्रत्यक्ष पाहणीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आमदार अशोक उईके यांच्या नेतृत्वातील चमूने कोरपना, जिवती या तालुक्यातील अनेक कामांची पाहणी केली. ग्रामपंचायत खडकी याठिकाणी त्यांनी भेट देऊन ग्रामस्थांची आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची गावांमध्ये अंमलबजावणी होते अथवा नाही याबाबत प्रत्यक्ष चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जिवती येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेला भेट दिली. 1987 पासून याठिकाणीही आश्रम शाळा सुरू आहे. या भेटीदरम्यान त्यांनी अनेक वर्गावर जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधांची स्वतः तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांसोबत जेवणही केले. यावेळी काही वर्गावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष कशा पद्धतीचा अभ्यास सुरू आहे, हे देखील जाणून घेतले. यावेळी जिवती, गडचांदूर परिसरातील विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी देखील त्यांना येऊन भेटले. यावेळी अप्पर आदिवासी आयुक्त ऋषिकेश मोडक, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, उपसचिव राजेश तारवी, अपर सचिव संजय कांबळे आदी अधिकारी देखील होते. 
आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वातील अन्य एका चमूने बल्लारपूर येथून प्रारंभ केला. मूल, सिंदेवाही, नागभिड या परिसरात त्यांनी भेट दिली . त्यांनी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कक्षास भेट दिली. तिसरी चमू आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वात चिमूरकडे रवाना झाली. वैभव पिचड यांनी चिमूरकडे रवाना होण्यापूर्वी जिल्ह्यातील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांना बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये बांबूपासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण आदिवासींना सर्वदूर भागात मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी भेटी दरम्यान व्यक्त केली. आदिवासी व्यक्तींना कौशल्ययुक्त नव्हे उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना गृह उद्योग सुरू करण्यासाठी बांबू प्रशिक्षण केंद्र उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाच्या मोठ्या योजनांमधून कायमस्वरूपी रोजगार निर्मितीच्या सोयी तयार झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
उद्या या समितीचा शेवटचा दिवस असून उद्या सकाळी 9.30 वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनांमध्ये आढावा घेतला जाणार आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्या विभागाचा आढावा घेतला गेला नाही, या विभागाचा देखील यावेळी आढावा होणार आहे. याशिवाय काही विभागाला गुरुवारी चर्चेदरम्यान त्रुटीची पूर्तता करण्याचे सांगितले होते. त्या सर्व विभागाचा खुलासा देखील उद्या संबंधित विभाग प्रमुखांना करावा लागणार आहे.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.