नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ रोजी ६०० करोडाच्या मह्सुलावर पाणीसोडत सुधीर मूनगंटीवार यांनी दारूबंदी केली .दारूबंदी झाल्यानंतर पोलीस यंत्रणेवर अंमलबजावणीची जबाबदारी आली.अश्यातच अवैध दारू पकडण्यासाठी पोलीस विभागाने विशेष पथक तयार केले.
मात्र रक्षक समजल्या जाणाऱ्या पोलिसांनीच अवैध दारूच्या कारवाया करत दारू पकडली अन तेच दारू भक्षक झाले.पोलिसांनी जप्त केलेल्या दारूपैकी काही दारू हि पथकातील पोलिसांनी क्वार्टर मध्ये ठेवली.
ऑगस्ट २०१५ मध्ये राजुरा पोलीस ठाण्यात या प्रकारात एक तक्रार दाखल करण्यात आली ज्यात पोलिसांनी पोलीस क्वार्टरवरच पोलीस पथकाने धाड घातली असता हे क्वार्टर उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकातील कर्मचा-याचेच निघाले. यात ३२ बाटल्या दारू आढळून आली होती. दारूबंदीनंतर लगेच काही महिन्यात थेट पोलीस अधिका-याच्या पथकातील कर्मचारी दारूसाठा बाळगल्याप्रकरणी कारवाईत अडकल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी ३ पोलीस कर्मचा-याना निलंबित केले होते. या प्रकरणी न्यायालयीन खटला चालविण्यात आला या खटल्याचा निकाल तब्बल ३ वर्षानंतर शुक्रवारी लागला.
यात राजुरा येथील प्रथम न्यायदंडाधिका-यांनी कठोर आदेश पारित करत रमेश आत्राम,विजय उइके, हेमंत बावणे या तीन पोलिसांना ३ वर्षांची शिक्षा व २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. अशा प्रकारच्या कारवाईत अशी कठोर शिक्षा होण्याची ही पहिली घटना असून या निर्णयाने पोलीस यंत्रणा देखील चांगलीच हादरली असून या नंतरच्या देखील पोलिसावर दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने दिलेली शिक्षेची पुनरावृत्ती देखील घडू शकण्याची संभाव्यता नाकारता येणार नाही.