সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, May 24, 2017

चंद्रपूरची पत्रकारिता : काल आणि आज

पत्रकारितेची मुर्हुतमेढ
चंद्रपूर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांनी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. माजी केंद्रीय अर्थमंत्री शांतारामबापू पोटदुखे, केशवराव नालमवार, रामदास रायपुरे, श्रीधर बलकी, चंपतराव लडके यांच्यासारख्या बुर्जूग पिढीने ही चळवळ पुढे नेली. केशवराव नालमवार यांच्या महाविदर्भ, तर रामदास रायपुरे यांच्या चंद्रपूर समाचार या वृत्तपत्राने पत्रकारांची शाळाच भरविली. पत्रकारितेतील अबकड त्यांनी तरुणपोरांना हात धरून शिकले. त्यांच्या वृत्तपत्रात पेपर वाटणारे बातम्या लिहायला शिकले आणि आज प्रादेशिक वृत्तपत्रात जिल्हा प्रतिनिधी ते संपादक या मोठ्या पदांवर पोहोचले. 2002च्या काळात दत्तात्रेय पत्तीवार यांनी चंद्रधून नावाचे दैनिक सुरू केले. त्यांना फार काळ तग धरता आली नाही. मात्र, वृत्तपत्राचे कार्पोरेट कार्यालय कसे असावे, हे दाखवून दिले. पुढे महाविदर्भही रंगीत झाले. आज त्यापाठोपाठ इतरही दैनिक रंगीत झालेत. आजघडीला साप्ताहिकांची संख्या शेकडोवर गेली आहे. नागपूरातून निघणारे महासागरही चंद्रपूरची स्थानिक आवृत्ती गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशित करीत आहे. सध्या महाविदर्भची धुरा कल्पना पलिकुंडावार, चंद्रपूर समाचारची चंद्रगुप्त रायपुरे, सन्नाटाची बंडू लडके, चंद्रधूनची जबाबदारी पुरुषोत्तम चौधरी पेलत आहेत.

असे घडले दिग्गज
प्रा. सुरेश द्वादशीवार, मदन धनकर यांच्यासारख्या अभ्यासू पत्रकरांनी नवा आयाम दिला. द्वादशीवार सरांनी लोकसत्तानंतर लोकमतचे संपादक म्हणून आजही कार्यरत आहेत. चंद्रपुरातून कारर्कीद सुरू करणारे बरीच मंडळी राज्यात विविध ठिकाणी मोठ्या पदावर आहेत. सुनील कुहीकर यांनी तरुण भारतमध्ये मुंबई ब्युरी चिफ ते मुख्य कार्यकारी अधिकारी, देवेंद्र गावंडे हे नागपूर (संपादकीय प्रमुख) ब्युरो चिफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा नक्षलविषयक वार्तांकन ख्यातनाम आहे. भूपेंद्र गणवीर हे सकाळचे निवासी संपादक म्हणून निवृत्त झाले, तर आनंद आंबेकर हे सकाळच्या जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक राहिले. महाराष्ट्र टाईम्सचे सध्याचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांनी चंद्रपूरात पत्रकारिता केली नसली तरी त्यांचे शिक्षण याच जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत झाले. लोकसत्तातून प्रारंभ केल्यानंतर त्यांनी सकाळमध्ये वृत्तसंपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. याच भूमितले प्रमोद चुंचुवार यांचे नाव महराष्ट्राला परिचित झाले. मुंबई, दिल्लीतील पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी टीव्ही 9ला सहयोगी संपादक म्हणून इनिंग सुरू केली. आज ही सर्व मंडळी वक्ते म्हणूनही दिसतात, हीच या मातीची उपलब्धी आहे.

तरुणांना मिळाली संधी
प्रादेशिक वृत्तपत्राचे पहिले जिल्हा कार्यालय लोकमतने सुरू केले. तेव्हा भूपेंद्र गणवीर यांनी जिल्हा प्रतिनिधी म्हणून धुरा सांभाळली. त्या पाठोपाठ अन्य दैनिकांनीही जिल्हा कार्यालयांची संकल्पना सुरू केली. त्या आधीच्या काळात फोन किंवा फॅक्‍सद्वारे नागपूरला बातम्या कळविल्या जायच्या. जिल्हा कार्यालये सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वृत्तपत्रांची स्पर्धा सुरू झाली. लोकमतनंतर तरुणभारत, नवभारत या दैनिकांनी जिल्ह्यातील बातम्यांसाठी स्वतंत्र पाने सुरू केलीत. या 2002च्या काळात लोकमतला गजानन जानभोर, तरुण भारतला सुनील कुहीकर, लोकसत्ताला देवेंद्र गावंडे तर नवभारतला प्रकाश शर्मा ही दिग्गज मंडळी होती. पुढे जिल्हा कार्यालयांनी जिल्हा प्रतिनिधीसोबत उपसंपादक, शहर वार्ताहर नियुक्ती होऊ लागल्या. तेव्हा स्थानिक दैनिकात काम करणाऱ्या तरुणांना कामाची संधी मिळाली. त्यातूनच संजय तायडे, आनंद आंबेकर, संजय तुमराम, महेंद्र ठेमस्कर, रविंद्र जुनारकर, प्रमोद काकडे, प्रमोद उंदिरवाडे, नंदकिशोर परसावार (लोकमत, जिल्हा प्रतिनिधी भंडारा), रवि जवळे, श्रीकांत पेशट्टीवार, मुकेश वाळके, देवनाथ गंडाटे, मंगेश खाटिक, प्रशांत देवतळे, सुशील नगराळे, जितेद्र मशारकर ही मंडळी स्थानिक दैनिकांतून प्रादेशिक दैनिकात आली. अनेक वर्षे पत्रकारितेत योगदान देणारे गजानन ताजणे, अजय धर्मपुरीवार, अरविंद खोब्रागडे, याशिवाय अनेकजण आज शासकीय आणि खासगी नोकरीत आहेत. पंकज मोहिरीर यांनी सामना, सकाळ आणि आता महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात काम करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या अध्ययनातूनच अनेक पत्रकार घडले. सुनील कुहीकर, अरविंद खोब्रागडे, रविंद्र जुनारकर यांनीही पत्रकार घडविण्यासाठी वेळ दिलस.

हिंदी, इंग्रजीतही योगदान
हिंदी पत्रकारितेत गिरिश खत्री गुरुजींनी मोलाचे योगदान दिले. श्रमिक पत्रकार संघाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. हिंदी वृत्तपत्रात पूर्वी केवळ नवभारत हे दैनिक होते. प्रकाश शर्मा यांच्यानंतर संजय तायडे आजही नवभारतीची धुरा पेलत आहेत. लोकमतने हिंदी आवृत्ती सुरू केली तेव्हा पंकज शर्मा यांनी समाचारला जिल्हा प्रतिनिधी होते. पुढे दैनिक भास्करमध्ये ते गेल्यानंतर अरुण सहाय रुजू झाले. हिंदीत मराठी भाषिक तरुणांनीही मोलाचा वाटा दिला आहे. मुकेश वाळके, काही काळ प्रकाश आकनुरवार आणि आता अनेक तरुण कार्यरत आहेत.
पूर्वी हितवाद हे एकमेव इंग्रजी दैनिक होते. फार पूर्वीपासून सुनील देशपांडे आजही कायर्रत आहेत. त्यांच्याच हाताखालून धडे गिरविणारे कार्तिक लोखंडेसह अंजय्या अनापर्ली नागपुरात मोठ्या पदावर आहेत. मजहर अली यांनी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत योगदान दिले. तेलगू भाषिक रमेश कालेपल्ली यांनी गेल्या अनेक वर्षांपासून इंग्रजीत योगदान देत आहेत.

जिद्दीने आले पुढे
वृत्तपत्र म्हटलं की, जिल्हा प्रतिनिधीसह उपसंपादक, वार्ताहर आणि पाने लावण्यासाठी ऑपरेटर असतात. एकेकाळ ऑपरेटर म्हणून कारर्कीर्द सुरू करणारेही आज स्वबळावर शिकून वार्ताहर ते उपसंपादक असा प्रवास गाठला आहे. यात रविंद्र जुनारकर (लोकसत्ता), साईनाथ सोनटक्के (सकाळ), साईनाथ कुचनकर (लोकमत, ठाणे) यांचे नाव पुढे येते.
अनेक शहर वार्ताहर अनुभवाच्या भरवशावर जिल्हा प्रतिनिधी झालेत. मात्र, गावात पत्रकारिता करून पुढे जिल्ह्याच्या स्थानी आलेत. याचीही काही उदाहरणे आहेत. सुनील कुहीकरांनी बल्लारपुरातूनच पत्रकारितेला प्रारंभ केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत बल्लापुरात तालुका प्रतिनिधी राहिलेले प्रशांत विघ्नेश्‍वर यांनी जिल्हा कार्यालयात प्रवेश मिळविला. वर्धा तरुण भारतमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहिल्यानंतर आता ते लोकशाही वार्तात जिल्हा प्रतिनिधी आहेत. विसापूर येथे वार्ताहर राहिलेले राजेश भोजेकर यांनी लोकमतमध्येच शहर वार्ताहर आणि पुढे वर्धा जिल्हा प्रतिनिधी आणि परत चंद्रपूर असा प्रवास केलेला आहे. प्रारंभी साप्ताहिक सुरू करून पत्रकारितेत आलेले गोपालकृष्ण मांडवकर यांनी लोकमतमध्येच यवतमाळ, वर्धा, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यातून चंद्रपूरमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. चिमूर तरुण भारत तालुका प्रतिनिधी कामाला प्रारंभ करणारे प्रशांत देसाई यांनीही पुण्यनगरी चंद्रपूर आणि आता लोकमत भंडारा येथे कायर्रत आहेत. राजुरा येथे तरुण भारतचे वार्तावर नागेश दाचेवार आत मुंबईचे ब्युरो चिफ म्हणून कार्यरत आहेत. ही उदाहरणे त्यांच्या जिद्दीचे फळ आहे.


टिव्हीवरही दिसले
पहिला वृत्तवाहिनी पत्रकार म्हणून महेश तिवारी यांनी कामाला प्रारंभ केला. चंद्रपूर आणि गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यात त्यांनी तत्कालिन इ-टिव्हीसाठी वार्तांकन केले. त्यांच्यापाठोपाट झी-24 ताससाठी आशिष अंबाडे, पूर्वी स्टार माझात सुनील तायडे, टीव्ही-9मध्ये नीलेश डहाट, सध्याच्या एबीपी माझात सारंग पांडे कायर्रत आहेत. सकाळचे जिल्हा प्रतिनिधी राहिलेले संजय तुमराम यांनी सामटीव्हीत प्रवेश घेतला. येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांत सीटी केबल, चंद्रपूर लाइव्ह आणि अन्य केबल न्यूज चॅनेलमुळे कॅमेरेमॅन तयार झाले. अनिल राजू, हैदर आणि अन्य तरुण आज दिसत आहेत.

बातमीसाठी तीदेखील
पत्रकारितेच्या क्षेत्रात महिलांची संख्या फार कमी दिसते. मात्र, कल्पनाताई पलिकुंडावर आजही महाविदर्भची जबाबदारी त्याच ताकदीने पेलत आहेत. चंद्रपूरात अनेक वर्षापूर्वी एका महिलेला साप्ताहिक सुरू केले. पुढे श्रमिक पत्रकार संघाने गौरवही केला. लोकसत्तात राखी चव्हाण, लोकमतला रुपाली टवलारकर, मध्यंतरीच्या काळात वैशाली अलोणे, तुलना येरेकर, नम्रता शास्त्रकार या भगिनींनी योगदान दिले.

श्रमिक पत्रकार संघ झाले तरुण
नागपूर मार्गावरील जुना वरोरा नाका चौकात श्रमिक पत्रकार संघाचे कार्यालय आहे. पूर्वी पत्रकार परिषद घेण्याचे ठिकाण अशी ओळख होती. मात्र, आता ती बदलली. सर्व पत्रकारांच्या हक्काचे ठिकाण अशी ओळख झाली आहे. नवनवीन उपक्रम, मीट द प्रेस, इमारतीची रंगरंगोटी, वार्षिक सहल, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यामुळे कौटुंबिक नात्याचा गोडावा येथे दिसून येतो. श्रमिक पत्रकार संघासह मराठी पत्रकार संघातर्फे तरुण पत्रकारांना बातम्यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार, तर ज्येष्ठांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाते.

अनेकजण नागपुरात
चंद्रपूरच्या मातीत जन्म घेऊन येथेच पत्रकारितेचे प्राथमिक धडे घेणारे नागपुरात संपादकपदावर कायर्रत आहेतच. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून याच भूमिची लेकरे नागपूरात स्थायिक झालीत. यात कार्तिक लोखंडे, अंजय्या अनापर्ली, राखी चव्हाण, देवनाथ गंडाटे, अंकुश गुडावार, इरशाद शेख, मनोज डोमकावळे यांचा समावेश आहे.


- देवनाथ गंडाटे
नागपूर

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.