ढासळलोय, खिळाखिळा झालोय!
इतिहासप्रेमींना माझा सप्रेम नमस्कार!
अहो! मी आहे, चंद्रपूर किल्ला!!!
तसा मी नशीबवान! एक नाही, अनेक त-हेने! गोंडराजांच्या काळात माझा जन्म झाला. तरुणपणात भोसल्यांनी साथ दिली. मात्र, पुढे ब्रिटिशांची जुलमी राजवट मी अनुभवली. जन्मापासून आजवर निसर्गाचा प्रकोप सहन करीत उभा आहे. जिथे गोंडराजे उठले, बसले, चालले, बागडले व नांदले. पण, आज त्या जागा हळूहळू ढासळत आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट होत आहेत. त्या अनेकांना दिसत होत्या. तरीही स्वातंत्र्यानंतरही मी मूकपणे साद देत आलो आहे.
एकेकाळी गोंडकालीन राजवटीत संरक्षणाची जबाबदारी आम्हा बुरुजावर होती. आम्ही ते समर्थपणे पेलत होतो. राजेसाहेबांचा शब्द वाया जात नसे. किल्ल्यावर सर्वसामान्य प्रजा येत नसली तरी, गोंडराजांचे सैनिक टेहळणी करीत असत. विविध शत्रूकडून होणारे आक्रमण आणि संरक्षण बाबत वेळोवेळी मिळणारे निर्देश त्याचे पालन करताना बघितले. तोफ ठेवण्यासाठी उंचवठा तयार केलेला आहे. त्यावर तोफ ठेवून शत्रूसोबत दोन हात करताना बुरुजांनी सैनिकांना साथ दिली. पण, आता वय वाढलंय. मजबुत दगडाची फरसबंदी तितकेच बुलंद "इरादे' सुद्धा मजबूत असले तरी, निसर्गापुढे कुणाचे काहीच चालत नाही. ढासळलोयः खिळाखिळा झालोयः आता काळजी वाटते मी संपून जाईन, अशीच भिती वाटत आहे. आता माझी पडझड थांबवा! माझी स्मृतीचिन्हे जपा! ही किंचाळी गेल्या अनेक वर्षापासून मी देत आहे. ती ऐकूनच इको-प्रोचे कार्यकर्ते धावून आले.
बुरुजावर, किल्ल्याच्या भिंतीवर वाढलेली वृक्षे, झाडी-झुडुपे यामुळे ठिक-ठिकाणी तडे जाऊन दगड ढासळलेले होते. छाती ताणून रणांगणात पराक्रम गाजविणाऱ्या या योद्धाची आता वृद्धापकाळात काठीचा आधार घेण्याची अवस्था निर्माण झाली होती. इको-प्रोचे कार्यकर्त्यांनी नुसती भेटच दिली नाही, तर प्रत्यक्ष कृतीत स्वच्छता अभियान राबविले. 56 दिवस माझ्या आजारापणावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आस्थेनं विचारपूस केली. तेव्हा राहावले नाही. डोळ्यातून अश्रू गाळताना माझे मलाच बालपण आठवू लागले. तो वैभवशाली काळ नजरेस आला. 550 वर्षांपूर्वी बांधलेला किल्ला गोंडकालीन किल्ला-परकोटाने वेढलेला. पाच पिढ्यातील गोंडराजांनी हा किल्ला 100 वर्षात बांधला. खांडक्या बल्लाळशाह या गोंडराजानी याचा पाया रचला, तर पाचव्या पिढीतील रामशाह गोंडराजांनी किल्ल्याच्या कामास पूर्णत्वास नेऊन चंद्रपूर शहर वसविले.
सात किमी लांबीचा किल्ला. त्यास दोन मुख्य प्रशस्त दरवाजे. दोन उपदरवाजे आणि 5 खिडक्या आणि सुमारे 39 बुरुज या किल्ल्यास आहेत. राणी हिराईने गोंडराज्यांच्या राजधानीचे शहर वसविताना भविष्यकालीन नियोजन केले होते. खंडाक्या बल्लाळशाह हे बल्लारपूर येथून गोंडराज्याचा कारभार पाहत असताना जंगल भ्रमंती आणि शिकारीसाठी चंद्रपूरच्या जंगल क्षेत्राकडे फिरत असताना हा परिसर त्यांना दिसला. पठाणपुरा गेट या राज्याचे प्रवेशद्वार बघूनच वैभवशाली गोंडराज्याची कल्पना येते. गेल्या कित्येक वर्षात या किल्ल्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्याच्या भिंतीस आणि बुरुजावर मोठ-मोठी वृक्ष वाढली आणि खोड-मूळांमुळे तडे गेलेत. अनेक ठिकाणी किल्ला खचला. किल्ल्लयाची हीच दुर्दशा आणि होणारे दुर्लक्ष याकडे जिल्ह्यातील पर्यावरण तथा सामाजिक क्षेत्रातील इको-प्रो पुरातत्व संवर्धन विभागाने पुढाकार घेऊन पंतप्रधान महोदयांनी सुरु केलेल्या भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान एक मार्च 2017 पासून सुरु केले. इको-प्रो संस्थेच्या नगर संरक्षक दलच्या स्वयंसेवकांच्या मदतीने रोज सकाळी 06:00 ते 10:00 वाजेपर्यंत श्रमदान करून किल्ला स्वच्छता अभियान राबविले जात आहे. यात रोज जवळपास 25-30 सदस्य नियमित श्रमदान करीत आहेत. आतापर्यंत पठाणपुरा गेट, बिनबा गेट व जटपूरा गेट व या गेट च्या आजूबाजूच्या किल्ल्याच्या भिंती आणि बुरुजावरील वाढलेली वृक्ष-वेली तोडण्यात आलेली आहे. सोबतच यावरील कचरा साफ करून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. किल्ल्याच्या उंच भिंती असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेचे अडव्हेंचर क्लबच्या माध्यमाने रोप बांधून दोरीच्या साहाय्याने वृक्ष-वेली तोडली जात आहे. बऱ्याच वर्षापासून किल्ल्याची काही बुरुजे निर्मनुष्य असल्याने यावर वाढलेली वृक्ष आणि झुडुपात मधमाश्याची पोळेसुद्धा आहेत. यामुळे हे अभियान अनेक पद्धतीने जिकरीचे आणि साहसिक झाले. या अभियानास लागणारी साहित्ये लोकसहभागातून संस्थेस नागरिकांनी देऊ केली आहे.
- देवनाथ गंडाटे