माथनी हे गाव नागपूर-भंडारा महामार्ग क्रमांक सहावर कन्हान नदीच्या कुशीत वसले आहे. नदीच्या पात्रात परिसरातील तसेच दूरवरून नागरिक अस्थी विसर्जनासाठी येत असतात. त्यामुळे या गावाला विशेष महत्त्व आहे. मौदा शहराच्या पैलतीरावर वसलेले गाव असले, तरी अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून कोसोदूर आहे. अनेक राजकीय नेत्यांनी निवडणुकीत गाव सुंदर बनविण्याच्या थापा मारल्या. औद्योगिकदृष्ट्या संपन्न मौदा तालुक्यात असलेले माथनी गाव लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मागासलेले आहे. गावाशेजारून कन्हान नदी गेली असताना येथे पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही.
--------
दृष्टिक्षेपात माथनी
भौगोलिक क्षेत्र : 1360.84 चौ.मी.
कृषिक्षेत्र : 790 हेक्टर
वनक्षेत्र : 70 हेक्टर
लोकसंख्या : 3025
वॉर्ड : 3
जिल्हा परिषद शाळा : 1
अंगणवाडी : 1
उपआरोग्य केंद्र : 1
ग्रामपंचायत कर्मचारी : 1 महिला, 2 पुरुष
राष्ट्रीयीकृत बॅंक : नाही
सहकारी बॅंक : नाही
सहकारी सोसायटी : 1, सहकारी पतसंस्था : 1, टपाल कार्यालय 1, सार्वजनिक विहीर 1, हातपंप 11, वीजखांब 230
........
18 तासांचे भारनियमन
गावात भारनियमनाचा मोठा प्रश्न आहे. 24 पैकी 18 तास वीज नसते. त्यामुळे विद्यार्थी, व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न पडतो. सततच्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त आहेत. वीजपुरवठा काढून घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे जवळच मौदा थर्मल पॉवर स्टेशन आहे. राज्याचे ऊर्जामंत्री तसेच पालकमंत्री बावनकुळे येथीलच असल्यामुळे 18 तासांचे भारनियमन होतेच कसे, असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
....
महामार्गावर "अंधेरा कायम रहे'
पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग माथनी गावातून गेला होता. परंतु, आता गावाबाहेरून नवीन मार्ग तयार करण्यात आला. गावापासून रस्त्यापर्यंतचे अंतर 1 किलोमीटरचे आहे. परंतु, या मार्गावर पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी "अंधेरा कायम रहे' अशी स्थिती असते. त्यामुळे महिलांना या मार्गाने जाणे कठीण होते. पथदिवे नसल्यामुळे चोरटेही सक्रिय असतात. त्यामुळे लूटमारीच्या घटना येथे नित्याच्याच झाल्या आहेत. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.
...
समाजभवनाची जीर्णावस्था
गावात समाजभवन आहे. अनेक वर्षांपासून इमारतीची डागडुजी न झाल्याने पावसाळ्याच्या दिवसांत पाणी गळते. त्यामुळे समाजभवन कुचकामी ठरते. लहानसहान कार्यक्रम करताना जागेअभावी नागरिकांची गैरसोय होते. लग्नसमारंभाच्या वेळी वराकडील मंडळीकडून तालुक्याच्या गावी सभागृह घेण्याची अट ठेवली जाते. त्यामुळे वधूपक्षाला मोठा आर्थिक फटका बसतो. गावात नवीन सुसज्ज समाजभवन बांधणे गरजेचे आहे.
...
स्मशान शेड नाही
निवडणुकीच्या काळात मतांचा जोगवा मागण्यासाठी राजकारणी गावात येतात. सत्ता येताच गावाकडे पाठ फिरविली जाते. त्यामुळे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्मशानभूमीची दुर्दशा झाली आहे. स्मशान शेड नसल्याने पावसाळ्यात, उन्हाळ्यात मृत्यूनंतरही गैरसोयीचा सामना करावा लागतो. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदारांप्रति नागरिकांमध्ये संताप आहे.
....
राष्ट्रीयीकृत बॅंकेअभावी गैरसोय
गावात एकही राष्ट्रीयीकृत बॅंक नाही. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बॅंक ऑफ बडोदाची शाखा कागदोपत्री मंजूर असल्यामुळे दुसरी अधिकृत बॅंक शाखा येथे नाही. गॅस सिलिंडर सबसिडी योजनेमुळे सध्या प्रत्येक कुटुंबीयाला बॅंक खाते उघडणे गरजेचे आहे. राष्ट्रीयीकृत बॅंक नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. गावात बॅंक ऑफ बडोदाने शाखा उघडावी किंवा अन्य राष्ट्रीयीकृत बॅंकेला उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
....
पशुवैद्यकीय रुग्णालयाला कुलूप
नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. सोबतच पशुपालनही केले जाते. परंतु, येथील पशुवैद्यकीय रुग्णालय डॉक्टरअभावी दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे औषधोपचारासाठी जनावरांना मौद्याला न्यावे लागते. पशुवैद्यकीय रुग्णालयाबाबत ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देण्यात आले; परंतु काही उपयोग झाला नाही.
....
अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा
कन्हान नदीच्या तीरावरील गाव, अशी माथनीची ओळख आहे. परंतु, गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. स्मशानघाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक महिन्यांपासून डागडुजी झालेली नाही. कच्च्या रस्त्यावरून स्मशानघाटाकडे जाताना तारेवरची कसरत करावी लागते.
.....
कोंडवाड्याची दैन्यावस्था
गावात कोंडवाडा आहे. परंतु, दोन वर्षांपासून त्याचे छत पडलेले आहे. भिंतींनाही तडे गेले आहेत. त्यामुळे कोंडवाड्याचे बांधकाम होणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसांत येथे साप-विंचवांचे वास्तव्य असते.
...
गावातच शेणखताचे खड्डे
देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. परंतु, माथनीत नागरिक गावातच किंवा रस्त्याच्या कडेला शेण टाकत असल्यामुळे गावात डासांचा त्रास वाढला आहे. सडलेल्या शेणातील विविध प्रकारचे कीटक साथरोगांना निमंत्रण देतात. आजारावर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा नागरिकांनी गावातील शेणखताचे ढिगारे शेतात हलविणे गरजेचे आहे. सध्या जिकडे-तिकडे स्वाइन फ्लूची साथ सुरू असल्यामुळे ग्रामस्थांनी आरोग्याच्या दृष्टीने सजग राहणे गरजेचे आहे.
....
लाइनमन केव्हा मिळेल?
गावात दोन वर्षांपासून लाइनमन नाही. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे बहुतांश वेळा बंद असतात. घरगुती कामासाठी दुसऱ्या लाइनमनला अधिकचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसतो. उन्हाळ्याच्या दिवसांत वारंवार वीज जात असल्याने त्वरित लाइनमन द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
...
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
नदीकाठावर असूनही गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. नागरिकांना हातपंप किंवा बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. पाण्याच्या टाकीत येणारे पाणी गढूळ असल्यामुळे गावात साथरोगांचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छ पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने गृहिणींमध्ये प्रशासनाप्रति संताप आहे. सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवा, अशी एकमेव मागणी महिलांची आहे.
...
व्यायामशाळा असावी
सकाळी फिरण्यासाठी गावात एकही मैदान नाही. त्यामुळे निदान तरुणांसाठी एखादी व्यायामशाळा असावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शिक्षणासोबत शारीरिक तंदुरुस्ती असणे गरजेचे असल्याने सुसज्ज व्यायामशाळा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
...
वाचनालय व्हावे
गावातील तरुण बेरोजगार आपला पूर्ण दिवस पानटपरीवर मोबाईलवर गेम खेळण्यात घालवतात. त्यांच्यासाठी गावात एखादे वाचनालय असणे गरजेचे आहे. त्यामुळे तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल. वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होईल.
...
रस्त्यावरच भरतो आठवडी बाजार
अनेक वर्षांपासून गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आठवडी बाजार भरतो. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आठवडी बाजाराच्या दिवशी दुकाने व वाहनांमुळे रस्ता जॅम होतो. त्यामुळे दुकानदारांची भांडणे ठरलेली आहेत. गावालगत झुडपी जंगल आहे. त्या ठिकाणी बाजारासाठी ओटे तयार करून बाजार भरविण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
....
बालोद्यान हवे
गावात एकही मैदान नाही. त्यामुळे लहान मुलांनी खेळायचे कुठे, हा प्रश्न पडतो. शहरी भागाप्रमाणे गावातही लहान मुलांसाठी एखादे बालोद्यान असावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. वृद्धांनाही त्यांचा सायंकाळचा वेळ तेथे घालवता येईल.
...
प्रवासी निवारा गावातच असावा
प्रवासी निवारा गावापासून 1 किमी अंतरावर असल्यामुळे आबालवृद्धांना ये-जा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी महिलांना पायपीट करावी लागते. शिवाय बसथांब्यापासून गावापर्यंत पथदिवे नाहीत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावात प्रवासी निवारा असणे गरजेचे आहे. गावात प्रवासी निवारा बांधण्यात यावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे.
....
यांना सांगा समस्या
खासदार कृपाल तुमाने : 9823288322
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे : 9049444444
सरपंच उमेश वाडीभस्मे : 9765205628
ग्रामविकास अधिकारी एन. जी. पठाडे : 9764894940
तहसीलदार शिवाजी पडोळे : 7789350538
खंडविकास अधिकारी सी. व्ही. आदमने : 9890296796
पोलिस निरीक्षक डी. एन. गायगोले : 9822103830
..
प्रतिक्रिया
बसस्थानक नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आबालवृद्धांना पायपीट करीत 1 किलोमीटरवरील बसथांब्यावर जावे लागते. त्यामध्ये बराच वेळ जातो. रात्रीच्या वेळी बसथांब्यावरून घर गाठताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पथदिवे नसल्याने चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे बसस्थानक ही प्राथमिक गरज पूर्ण व्हावी.
- खुशाल तांबडे, माजी पं. स. सदस्य
....
सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गावात हक्काचे ठिकाण असावे. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आगामी काळात गावात एखादे सांस्कृतिक भवन बनावे.
- माधुरी पिसे, ग्रामपंचायत सदस्य
...
मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूंना आठवडी बाजार भरत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. सायंकाळच्या वेळी या रस्त्याने पायी चालणे कठीण होते. त्यामुळे बाजाराची जागा बदलून रस्त्याशेजारचा जंगल परिसर स्वच्छ करून ती जागा आठवडी बाजारासाठी मिळावी.
- नेताजी कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य
...
गावात 16 ते 18 तासांचे भारनियमन असते. त्यामुळे विद्यार्थी, व्यापारी आणि शेतकऱ्यांची अडचण होते. अनेक पथदिवे बंद आहेत. लाइनमन नसल्यामुळे पथदिव्यांची दुरुस्ती होऊ शकत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी लाइनमन मिळावा.
- योगेश वाडीभस्मे, सरपंच
....
मौदा तालुका औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे ऊर्जामंत्री असताना गावात 18 तासांचे भारनियमन होते. ही शोकांतिका आहे. सध्या परीक्षांचे दिवस आहेत. शेतीलाही सिंचन गरजेचे आहे. त्यामुळे भारनियमन कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा.
- सुदाम इखार, उपसरपंच
.....
गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नदीकाठावर वस्ती वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार गावठाणवाढीची जागा मिळणे गरजेचे आहे.
- सहादेव तिघरे, माजी सरपंच
.....
गावात अनेक ठिकाणी अवैध दारूविक्रीचे अड्डे आहेत. पोलिसांचे अभय असल्यामुळे दारूविक्रेत्यांचे फावते. मुख्य रस्त्यालगत दारुड्यांचा ठिय्या असतो. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. अवैध दारूविक्रीवर बंदी आणणे गरजेचे आहे.
- दिलीप कांबळे, उपाध्यक्ष भोई समाज
...
गावात जिवंत माणसाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मरणानंतरही समस्यांचे चक्र काही संपत नाही. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. त्यामुळे आवागमन करण्यास त्रास होतो. मोक्षाकडे जाणाऱ्या या मार्गाची तरी निदान दुरुस्ती व्हावी.
- प्रदीप बावणे, सामाजिक कार्यकर्ते
संकलन : तुकाराम लुटे (7588748755)