चंद्रपूर- बुद्ध हा जगातील सर्वांत मोठा विचार आहे. तो अंगी बाणला तर बहुजनांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तत्पूर्वी बुद्ध समजून घेणे महत्त्वाचे आहे. शिवधर्मातून बहुजन समाजाला बुद्ध आणि त्यांचे विचार समजावून सांगू, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
येथील चांदा क्लब मैदानावर जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे आयोजित नवव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनात रविवारी (ता. 28) त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. ही मुलाखत इंजिनिअर चंद्रशेखर शिखरे आणि गंगाधर बनबरे यांनी घेतली. प्रारंभी त्यांनी कौटुंबिक, शैक्षणिक प्रवासातील आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ""बालपणी गावात संस्काराचे केंद्र नव्हते. कुठे वैचारिक किंवा शैक्षणिक जडणघडण करण्यासाठी सोय नव्हती. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी व्हावे लागले. देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि त्याग यावर तिथे धडे मिळाले. त्यांच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी एकदा कमरेचा चांदीचा करदोटाही विकला. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा चेहरा कळला. आपण कुठे तरी चुकीच्या दिशेला जात आहोत, हे वेळीच कळले. तेव्हा सावरलो. त्यातूनच लिहिले ते "धर्म आणि धर्मापलीकडे.'' चार्वाकमुळे आयुष्य बदलल्याचे सांगत मुलांवर वाईट संस्कार होणार नाहीत याचे आजच्या पालकांनी भान ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
"भाकरीचा प्रश्न महत्त्वाचा असताना, शिवधर्माची गरज का भासली', या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. धर्माच्या ऐतिहासिक गरजेपेक्षा वेगळा विचार करण्याच्या क्षमतेमुळेच शिवधर्म या नवीन विचारांची उकल करण्याची आवश्यकता भासल्याचे डॉ. साळुंखे म्हणाले. जगाला बुद्ध विचारांची गरज असून, धम्म स्वीकारण्यापूर्वी सर्व बहुजन समाजाने बुद्ध समजून घेण्याची गरज आहे. हा विचार शिवधर्मातून जागृत करून माणसे जोडण्याचे काम केले जाईल, असेही ते म्हणाले.