সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 20, 2010

जिगरबाज सचिन

सचिनची कारकीर्द -


 नाव - सचिन रमेश तेंडुलकर

जन्म - २४ एप्रिल १९७३ (ठिकाण - मुंबई)

आताचे वय - ३७ वर्षे, १९४ दिवस

उंची - ५ फुट ५ इंच

शिक्षण - शारदाश्रम विद्यामंदिर शाळा, मुंबई

कुटूंब - आई, भाऊ - अजित, नितीन, बहिण - सविता, पत्नी - अंजली, मुलगा - अर्जुन, मुलगी - सारा



कसोटी कारकीर्द - (या मालिकेपूर्वीची कामगिरी)

धावा - १४ हजार ३६६

सामने - १७४

डाव - २८४

सरासरी - ५६.५५

सर्वाधिक धावा - नाबाद २४८

अर्धशतके - ५९

शतके - ४९

द्विशतके - ६

मिळवलेले बळी - ४४



एकदिवसीय कारकीर्द -

धावा - १७ हजार ५९८

सामने - ४४२

सरासरी - ४५.१२

सर्वाधिक धावा - नाबाद २००

अर्धशतके - ९३

शतके - ४६

मिळवलेले बळी - १५४



ट्वेंटी-२० कामगिरी -

सामने - १

धावा - १०



कर्णधारपदाची कारकिर्द -

कसोटी - १९९६ ते २०००, २५ सामने - २०५४ धावा, ७ शतके, ७ अर्धशतके, सरासरी ५१.३५.

एकदिवसीय - १९९६ ते २०००, ७३ सामने - २४५४ धावा, ६ शतके, १२ अर्धशतके, सरासरी - ३७.७५.



पुरस्कार -

- कॅस्ट्रॉल क्रिकेट ऍवॉर्ड - डिसेंबर २००६ (सुनिल गावसकर यांच्या ३४ शतकांचा विक्रम मोडीत काढल्याबद्दल गावसकर यांच्या हस्ते जोहान्सबर्ग येथे प्रदान.

- १०० वी कसोटीपूर्ण - सप्टेंबर २००२ मध्ये बीसीसीआयकडून सन्मान.

- महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०००-०१ वर्षासाठी) - महाराष्ट्र सरकारकडून सन्मान - १० किलोग्रॅम चांदीची बॅट आणि अडीच लाखाचा धनादेश - मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान.

- अर्जुन पुरस्कार - वर्ष १९९४ - ५० हजार रूपये आणि अर्जुन प्रतिमा प्रदान

- विस्डेन क्रिकेट ऑफ दि ईयर - १९९७ मध्ये पुरस्कार (११ वा भारतीय खेळाडू)

(विस्डेनने आपल्या २००२ मधील लेखात सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वश्रेष्ठ खेळाडूचा दर्जा दिला आहे.)

- राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार - १२ ऑगस्ट १९९८ - भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान.

- पद्‌मश्री पुरस्कार - वर्ष १९९९ - क्रिकेटमधील योगदानाबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सोहळ्यात प्रदान.

- पद्‌मभूषण पुरस्कार - २००८ - राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.

- २०१० मध्ये एलजी क्रीडा चाहत्यांचा आवडता खेळाडूचा सन्मान मिळाला

- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) २०१० मध्ये वार्षिक क्रीडा पुरस्कारात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान.
 
सचिन तेंडुलकरमध्ये किती जिगर आहे, याची चुणूक १९८९ मध्येच बघायला मिळाली. पाकिस्तान दौऱ्यात या खेळाडूने वयाच्या सोळाव्या वर्षी ज्या पद्धतीने इम्रान, अक्रम, वकार यांच्या गोलंदाजीचा सामना केला, त्याला तोड नव्हती. तेव्हाच खात्री पटली होती, की हा महान खेळाडू होणार.
- चंदू बोर्डे



भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा. साल होते १९८९. भारतीय संघाच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष. प्रसिद्धिमाध्यमात आणि क्रिकेट समीक्षकांमध्ये त्या वेळी खूपच चर्चा झाली. इम्रानखानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघात वसिम अक्रम, वकार युनुस, जावेद मियॉंदाद यांसारखे दिग्गज खेळाडू असल्याने, भारताला दारुण पराभवाचा सामना करावा लागणार, असे भाकीत काही मंडळींनी केले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध सौहार्दाचे नव्हते. या पार्श्‍वभूमीवर भारतीय संघ पाकिस्तानला निघाला होता. या पारंपरिक संघात पुन्हा एकदा सामने सुरू होणार असल्याने सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. या दोन संघांतील सामने म्हणजे निकराची लढाईच असते. अशा परिस्थितीत एका सोळा वर्षाच्या मुलाची भारतीय संघात निवड झाली आणि त्याबद्दल निवड समितीला टीकेचा सामनाही करावा लागला होता. हा सोळा वर्षांचा मुलगा म्हणजे, सचिन तेंडुलकर. संघाचा कर्णधार होता, कृष्णम्माचारी श्रीकांत आणि मी व्यवस्थापक. या दौऱ्यात आमची खरी कसोटी लागणार होती. त्यामुळे स्वाभाविकच मानसिक दडपण होते; परंतु सचिनच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही दडपण दिसत नव्हते. एखाद्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे तो धीरोदात्त होता.



आज सचिनने साऱ्या जागतिक क्रिकेटला जिंकले असताना मला तो वीस वर्षांपूर्वीचा काळ आणि कोवळ्या वयातील हा खेळाडू अजूनही डोळ्यांसमोर येतो. साध्या साध्या गोष्टीत महान खेळाडूची महानता दिसून येते, तशी ती सचिनमध्ये सुरवातीलाच दिसली. पाकिस्तानात दाखल झाल्यावर सरावासाठी मैदानावर जाण्यासाठी आम्ही सर्व जण तयार होत असताना सचिन केव्हाच तयार होऊन बसमध्ये जाऊन बसायचा. मैदानावर जाऊन कधी एकदा सराव सुरू करतो, असे त्याला व्हायचे. त्याची देहबोली खूप काही सांगून जायची. मैदानावरही तो कधी एके ठिकाणी थांबत नसे. क्षेत्रक्षणाचा सराव करताना प्रत्येक चेंडूवर तो झेपावायचा. सर्व वरिष्ठ खेळाडू गोलंदाजी करून थकले, की हा पोरगा गोलंदाजी करायचा. विशेष म्हणजे अगदी शेवटपर्यंत न थकता तो गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करायचा. आपल्यामध्ये क्रिकेट किती भिनले आहे, किंबहुना क्रिकेट हेच आपले सर्वस्व आहे, हे त्याने लहान वयातच दाखवून दिले. संघातील सर्वांत लहान वयाचा खेळाडू असूनही त्याची प्रगल्भता वाखाणण्याजोगी होती. सराव सत्र संपल्यावर त्याला नेटमधून बाहेर काढणे अवघड जायचे. याबाबत एक प्रसंग मला चांगला आठवतो. सामना ज्या दिवशी होता, त्या वेळी आम्ही सकाळी सराव करीत होतो. सामन्याची वेळ जवळ आल्यानंतर नेट प्रॅक्‍टिस बंद करायची असते. त्यामुळे आम्ही सराव बंद करून पॅव्हेलियनमध्ये जायला लागायचो; परंतु सचिन मात्र नेटमधून काही केल्या हलायचा नाही. शेवटी ग्राऊंडसमन मला येऊन सांगायचा, "सर अभी नेट निकालना चाहिये, क्‍योंकी हमे तय्यारी करनी है.' अशा वेळी सचिन आणि त्याचा साथीदार सलील अंकोला यांना जवळजवळ ओढून बाहेर काढावे लागे.



काही दिवसांच्या सरावानंतर प्रत्यक्ष मालिकेला प्रारंभ झाला. सुरवातीला भारतीय फलंदाजी म्हणावी तशी बहरत नव्हती, त्यामुळे सियालकोटच्या सामन्यासाठी आम्ही सचिनला खेळवायचे ठरविले. या सामन्यासाठी पाकिस्तानने त्यांना अनुकूल ठरणारी खेळपट्टी तयार केली होती. "ग्रीन टॉप' खेळपट्टीवर त्यांच्या वेगवान माऱ्याचा सामना करण्याचे आमच्यापुढे आव्हान होते. या कसोटीसाठी इंग्लंडचे शेफर्ड आणि हॅम्पशायर हे पंच होते. त्यांनी विचारले, की खेळपट्टी कुठे आहे? त्यावर ग्राऊंडसमनने "ही काय खेळपट्टी' असे म्हणून ती दाखवली. सांगायचे तात्पर्य, की आजूबाजूचे मैदान आणि खेळपट्टी यामध्ये काहीच फरक नव्हता. अशा खेळपट्टीवर सचिन प्रथमच खेळणार होता. सामना सुरू झाला आणि जे व्हायचे तेच झाले. पहिले चार फलंदाज झटपट बाद झाले. अतिशय बिकट परिस्थितीत सचिन मैदानावर उतरला, तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंचा चेहरा "आला आपला बकरा आला,' असाच काहीसा बोलका होता. कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच षटकात त्याला वकारच्या माऱ्याला तोंड द्यावे लागत होते. पहिलाच चेंडू उसळी घेऊन आला. तो सचिनच्या तोंडावर आदळला. हेल्मेट असतानाही त्याला मार लागला. त्याच्या दातातून रक्त येऊ लागले. मी आणि फिजिओ मैदानावर धावत गेलो. आम्ही त्याला म्हणालो, "ड्रेसिंग रूममध्ये चल,' पण सचिन भयानकच खंबीर आणि जिगरबाज. मी खेळणारच, असे त्याने ठामपणे सांगितले. दातातून रक्त येत असतानाही तो खेळण्यासाठी सज्ज झाला आणि आश्‍चर्य म्हणजे पुढील तीन चेंडू त्याने लीलया सीमापार केले. एवढेच नाही, तर त्याने अर्धशतक झळकावले आणि "वंडर बॉय' म्हणजे काय असते, ते त्याने दाखवून दिले. तेथपासून सर्वत्रच त्याचे कौतुक सुरू झाले.



सचिनची जिद्द, खेळण्याची तळमळ, धावा करण्याची भूक न संपणारीच. कठोर परिश्रम आणि तंत्रशुद्ध फलंदाजी ही त्याची खासीयत. शंभर टक्के तंदुरुस्त राहण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतो. आपल्यावर होणाऱ्या टीकेकडे तो लक्ष देत नाही. त्याला उत्तर देतो, ते बॅटनेच. पंचांनी चुकीचा निर्णय दिला, तरी त्याबद्दल तो नाराजी व्यक्त करीत नाही. पुढील सामन्यात खणखणीत खेळाने तो त्याला उत्तर देतो. वरिष्ठ खेळाडूंबद्दल त्याच्या मनात कमालीचा आदर. त्यांचे सल्ले तो शिरसावंद्य मानतो. चुकीच्या पद्धतीने खेळून बाद झाल्यानंतर ती चूक पुढील सामन्यात होणार नाही, याची तो सतत काळजी घेतो, त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. याची प्रचिती इंग्लंड दौऱ्यात आली. २००७ मध्ये मी पुन्हा भारतीय संघाचा व्यवस्थापक झालो, तेव्हाचा हा दौरा. स्कॉटलंड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होता. या सामन्यात जॅक कॅलिसने सचिनला त्रिफळाबाद केले. तेव्हा पॅव्हेलियनमध्ये तो थोडासा निराश होऊन बसला होता. काही वेळाने मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो, ""मिडल स्टंपवर चेंडू पडल्यावर तो मिडविकेटच्या दिशेने खेळायचा नाही; सरळ गोलंदाजाच्या दिशेने मारायचा.'' दुसरे दिवशी आम्ही दोघे नेटमध्ये गेलो आणि थोड्या अंतरावरून मी त्याला चेंडू टाकत राहिलो. तेव्हा सचिनने मिडल स्टंपवरील सर्व चेंडू गोलंदाजाच्या दिशेने मारण्याचा सराव केला. पुढील सामन्यात त्याने त्याच पद्धतीने फलंदाजी करून दौऱ्यात सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी केली.

सचिनची ही वाटचाल अशीच चालू आहे; किंबहुना वय वाढत असतानाही त्याची फलंदाजी अधिकाधिक बहरत आहे. ३७व्या वर्षीही तो तीच जिद्द दाखवत आहे. विक्रमांमागून विक्रम करणे, ही त्याची जणू काही सवयच होऊन बसली आहे. त्याच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीपैकी जवळजवळ अठरा वर्षांच्या कारकिर्दीचा मी जवळचा साक्षीदार आहे. व्यवस्थापक, निवड समिती अध्यक्ष अशा विविध भूमिकांतून मी त्याला पहिलेय. त्याने असेच खेळत राहावे आणि भारतीय क्रिकेटला आणखी उंचीवर न्यावे, ही सदिच्छा.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.