সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 30, 2010

भंडारा जिल्ह्यात 132 गावांमध्ये दूषित पाणी

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
भंडारा - "पाणी हे जीवन आहे' त्यामुळे शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध करणे, हा सर्वांचा अधिकार आहे. मात्र, जिल्ह्यातील 132 गावांतील नागरिक आजही दूषित पाणी पिऊन जीवन जगत असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे, सात वर्षे उलटूनही पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाने पाण्याच्या नमुन्यांचे सर्वेक्षण केलेले नाही. अशुद्ध पाण्यामुळे अनेक नागरिक जीवनभराचा आजार घेऊन आयुष्याचा अंत बघत आहेत.
जलस्वराज्य विभागाने 2003 मध्ये पाण्याच्या नमुन्यांचे सर्वेक्षण केले होते. जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या सर्वेक्षणाचा अहवाल ग्राह्य धरून भविष्यातील 2010 ते 12 यावर्षांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना आखली. मागील वर्षी पाणीपुरवठा विभागाने नळयोजनेच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव आखून एक कोटी 87 लाखांची तरतूद केली होती. मात्र, त्या योजनेचा अद्याप पत्ता नाही. जलस्वराज्य विभाग आणि प्रयोगशाळेच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील एकूण 132 गावे दूषित पाण्याच्या विळख्यात आहेत. यात फ्लोराईडग्रस्त 51, लोहयुक्त 21, नत्रयुक्त 48, क्षारयुक्त 12 गावांचा समावेश आहे. तुमसर तालुक्‍यातील लेंडेझरी आणि विटपूर या गावातील स्थिती अत्यंत विदारक आहे. अनेकांची पाठीची हाडे वाकलेली आहेत. लहान मुलांची दाते पिवळी पडली आहेत. येथे डी क्‍लोरिनेशन यंत्र बसविण्यात आले होते. मात्र, त्याचाही उपयोग झालेला नाही.
भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांसाठी एक प्रयोगशाळा आहे. मात्र, तिथे अत्याधुनिक सुविधा नसल्याने काहीही फायदा होत नाही. तपासणीसाठी वेळ जातो. शिवाय पाण्याच्या नमुन्यांची चाचणीही व्यवस्थित होत नाही.
प्रयोगशाळेच्या नमुने चाचणीनुसार सरासरी एक लिटर पाण्यात सात मिलिग्रॅम फ्लोराईड आढळून आले. भंडारा तालुक्‍यातील अंबाडी येथे 3.80 मिलिग्रॅम, मोहदुरा येथे सात मिलिग्रॅम, गुडरी येथे लोहाचे प्रमाण 2.2 मिलिग्रॅम आढळून आले होते. सात वर्षे लोटूनही नव्याने सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. याकडे पाणीपुरवठा, आरोग्य, नगरपालिका आणि भूजल विभागाने लक्ष न दिल्याने दूषित आणि क्षारयुक्त पाण्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.



दृष्टिक्षेपात गावे


फ्लोराईडग्रस्त - 51


लोहयुक्त- 21


नत्रयुक्त- 48


क्षारयुक्त- 12


एकूण- 132






फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे 20 वर्षांचा तरुण म्हातारा दिसायला लागतो. दात पिवळे पडणे, पाठीचे हाड वाकल्याने कुबड्या चालणे आदी लक्षणे दिसतात. दूषित पाण्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवतात.

- डॉ. गोपाल व्यास, अस्थिरोगतज्ज्ञ, भंडारा.



फ्लोराईडग्रस्त गावांतील पाण्याचे नमुने आरोग्य विभागामार्फत पाठविण्यात आले. नवीन पाणीपुरवठ्याच्या योजना जलस्वराज्यच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडून करवून घेतल्या. अनेक कामे झाली आहेत.

- संजय बाविस्कर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.