Thursday, November 18, 2010 AT 12:00 AM (IST)
देवनाथ गंडाटे
चंद्रपूर : गेल्या चार दशकांत केवळ दीड एकर शेतीत विविध प्रयोग करून ख्यातनाम "एचएमटी'सह भाताची (धान) नऊ वाण विकसित करणाऱ्या 72 वर्षीय दादाजी खोब्रागडे या अल्पभूधारक शेतकऱ्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. दरवर्षी "फोर्ब्ज' मासिकातर्फे जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांची यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीत श्री. खोब्रागडे यांच्यासह सात भारतीय शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे मूळचे रहिवासी. अल्पभूधारक असलेल्या दादाजींनी आपल्या शेतात नवीन काहीतरी करण्याच्या उद्देशाने प्रयोग सुरू केले. 1983मध्ये त्यांनी अत्यंत बारीक आकाराचे आणि खाण्यास चवदार असे भाताचे वाण शोधण्यास सुरवात केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांनाही पीक घेण्यास सांगितले. त्यावर कुणी विश्वास ठेवला नाही; मात्र गावातील भीमराव शिंदे या शेतकऱ्याने या वाणाची पेरणी केली आणि पहिल्याच वर्षी 90 क्विंटल भाताचे उत्पादन निघाले. या यशस्वी प्रयोगाने मग एकामागून एक शेतकरी पुढे येऊ लागले. पहिल्या हंगामात निघालेले धान तळोधी येथील बाजार समितीत नेण्यात आले. तेव्हा या धानाचे नावही कुणाला ठाऊक नव्हते. कुणाच्या तरी मनगटावर असलेले घड्याळ बघून "एचएमटी' हे नाव देण्यात आले. तेव्हापासून पंचक्रोशीतील "एचएमटी' संपूर्ण जिल्ह्यात गेले. आज सुमारे पाच राज्यांमध्ये एक लाख एकरावर "एचएमटी'ची लागवड होऊ लागली आहे.
दादाजींच्या या प्रयोगाची पहिली दखल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सिंदेवाही येथील कृषी संशोधन केंद्राने घेतली. 1994मध्ये हे वाण तज्ज्ञांनी अभ्यासासाठी घेतले; मात्र चार वर्षांनी याच केंद्राने हे वाण "पीकेव्ही' नावाने बाजारात आणले. तेव्हापासून दादाजींनी शासकीय यंत्रणेसोबत लढा सुरू केला. यानंतर दादाजींनी "विजय नांदेड', "नांदेड 92', "नांदेड हिरा', "डीआरके', "नांदेड चेन्नूर', "नांदेड दीपक', "काटे एचएमटी' आणि "सुगंधी' हे नऊ वाण विकसित केले आहेत. या कामासाठी दादाजींना 12 पुरस्कार मिळाले असून, राज्य शासनाचा कृषिभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथील संस्थेतर्फे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या हस्ते दादाजींना पुरस्कार देऊन गौरविले. आज अमेरिकेतील फोर्ब्ज मासिकाने दखल घेतल्याने दादाजींसह ग्रामीण शेतकऱ्यांची मान उंचावली आहे.
कृषी क्षेत्रात जगाच्या पातळीवर नाव कमावलेले दादाजी एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. मध्यंतरी मुलाच्या आजारपणामुळे काही शेतीही विकावी लागली. मुले मजुरी करून पोट भरतात. त्यामुळे "हातावर आणून पानावर खाणे' अशी स्थिती दादाजींची आहे.
फोर्ब्जच्या यादीतील इतर भारतीय ग्रामीण उद्योजक
मनसुखभाई जगानी ः दुचाकी ट्रॅक्टरची निर्मिती. सुमारे 16,000 रुपये इतकी या ट्रॅक्टरची किंमत आहे. अर्ध्या तासामध्ये दोन लिटर पेट्रोल खर्च करून या ट्रॅक्टरद्वारे एक एकराचे क्षेत्र नांगरता येते.
मनसुखभाई पटेल ः मूळचे शेतकरी असलेले मनसुखभाई पटेल यांनी कापूस बोंडे वेचण्यासाठी यंत्र विकसित केले आहे. यामुळे मानवी श्रम कमी करणे शक्य झाले आहे.
मनसुखभाई प्रजापती ः मनसुखभाई प्रजापती हे व्यवसायाने कुंभार आहेत. त्यांनी मातीचा तवा आणि मातीचा फ्रिज विकसित केला आहे. मातीच्या तव्याची किंमत 100 रुपये आहे. मातीचा फ्रिज चालवण्यासाठी विजेची गरज लागत नाही.
मदनलाल कुमावत ः केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले श्री. कुमावत यांनी बहुमळणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे विविध धान्यपिकांची मळणी करता येते, धान्याला आपोआप वारा देऊन ते पोत्यांमध्ये भरणे शक्य होते.
किशोर बियाणी ः भारतातील "सॅम वॉल्टन' म्हणून ओळखले जाणारे आणि "फ्युचर' समूहाचे चेअरमन असलेले किशोर बियाणी यांचाही या यादीत समावेश आहे. त्यांनी 25 शहरांमध्ये "बिग बझार' मॉलची साखळी उभारली आहे. याद्वारे अन्नधान्यासह शेतीमालाच्या विक्रीला "मॉल'च्या माध्यमातून नवा आयाम दिला आहे.
अंशू गुप्ता ः आपल्या व्यवसायाला सामाजिक अधिष्ठान देऊन श्रीमतांच्या घरांतून वापरात न असलेले कपडे गरिबांपर्यंत पोचवण्याचे काम "गूंज' या संस्थेच्या माध्यमातून श्री. गुप्ता यांनी चालवले आहे. याद्वारे अनेकांना रोजगार तर मिळालाच आहे. पण दर महिन्याला 30 टन वजनाचे कपडे गोळा करून ते गरिबांपर्यंत पोचविले जाते.
केतन पटेल ः ट्रॉयका फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक असलेले श्री. पटेल यांनी जगातील पहिले वेदनारहित आयक्लोफेनॅक इंजेक्शन विकसित केले आहे. या इंजेक्शनमुळे रुग्णाची वेदना कमी केली जाते, तसेच सूजही कमी करता येते.
चिंतनकिंडी मल्लेश्याम ः श्री. मल्लेश्याम यांनी "लक्ष्मी आसू' यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे हातमागाद्वारे होणाऱ्या वस्त्रनिर्मिती क्षेत्रात नवी क्रांती आली आहे. या यंत्राद्वारे दिवसात सहा साड्या तयार करता येतील इतक्या स्वरूपाचा धागा तयार करता येतो. या यंत्रामुळे मानवी श्रम कमी करणे शक्य झाले आहे.
http://www.agrowon.com/