সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, August 26, 2015

देहविक्रीच्या आर्थिक व्यवहारातून महिलेचा खून

तरुणीसह दोघांना अटक : गोंडखैरी टोलनाक्‍याजवळ सापडला होता मृतदेह

कळमेश्‍वर : राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील गोंडखैरी टोलनाक्‍याजवळ पाल पेट्रोलपंपाच्या विरुद्ध बाजूला नऊ ऑगस्ट रोजी 35 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. तपासांत मृतदेहाची ओळख पटली. राणू ऊर्फ सुरेखा देवेंद्र बोरकर असे तिचे नाव आहे. ती इंदोरा, जरिपटका, नागपूर येथील रहिवासी होती. तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. हा खून देहविक्री व्यवसायाच्या आर्थिक व्यवहार व व्यवसायातील चढाओढीतून झाल्याचे स्पष्ट झाले.
गोंडखैरी टोलनाक्‍याजवळ सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके नेमली. सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल व सहकाऱ्यांनी नागपूर शहर व आसपासच्या परिसरात महिलेच्या फोटोच्या साहाय्याने शोध घेतला. वाडी येथे मृत महिलेचा मानलेला भाऊ सावन ऊर्फ भारत याने बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. त्यात तिचे नाव राणू ऊर्फ सुरेखा देवेंद्र बोरकर असल्याचे उघड झाले. ओळख पटल्यानंतर मृत महिला सुरेखा हिच्या जवळच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. सायबर सेलचे नायब पोलिस शिपाई अजय तिवारी यांनी अधिक माहिती मिळविली. त्यात सुरेखा बोरकर हिची मैत्रीण पद्मा (काल्पनिक नाव) व तिचा प्रियकर राहुल टाके (रा. कळमेश्‍वर ह. मु. दाभा, वाडी) यांचा घटनेत संबंध असल्याचे उघड झाले. देहव्यापाराच्या आर्थिक वैमनस्यातून सुरेखा व पद्मा यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन ताणतणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी पद्मा व राहुल यांची वैयक्तिक माहिती संकलित केली. त्यांचा मूळ निमजी, फेटरी व सध्या राहत असलेल्या वाडी येथील आंबेडकरनगर, दाभा या परिसरात तपास करण्यात आला. घटनेनंतर दोघेही नागपुरात असल्याचे कळले. राहुल टाके याची मानलेली बहीण निर्मला राऊत (रा. सावनेर) यांच्या संपर्कात राहुल व पद्मा असल्याचे समजले. याच माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद सराफ हे पथकासह 24 ऑगस्ट रोजी सावनेरला गेले. निर्मला राऊत यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याकडून पद्मा व राहुल संदर्भात माहिती घेतली. तेव्हा ते दोघेही मालीपुरा (ता. आश्‍टा, जि. सिहोर, मध्य प्रदेश) येथे राहत असल्याचे समजले. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने राहुल व पद्मा यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा आष्टा येथील जगन्नाथ नारायणसिंह मेवाडा (वय 60) यांच्या घरी ते वास्तव्यास असल्याचे समजले. निवासस्थानी छापा घालून पद्मा व राहुल यांना ताब्यात घेतले. देहविक्री व्यवसायाच्या आर्थिक व्यवहार व व्यवसायातील चढाओढ या द्वेषापोटी खून केल्याची त्यांनी कबुली दिली.
पोलिसांनी राहुल व त्याची प्रेयसी पद्मा या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कळमेश्‍वर पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर, सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, अरविंद सराफ, कर्मचारी बनसोड, अविनाश राऊत, राजेश सनोढिया, शैलेश यादव, चेतन राऊत, अमोल वाघ, रोहणकर, बाबाराव केचे, लक्ष्मीप्रसाद दुबे, सूरज परमार, अजय तिवारी, ज्ञानेश्‍वर पाटील, संगीता वाघमारे यांनी केली.
----------------

अशी केली हत्या
आरोपी राहुल मुरलीधर टाके हा प्रकाश गीते यांच्या घरी किरायाने दाभा वाडी नागपूर येथे राहायचा. त्याची प्रेयसी पद्मा (वय 19) या दोघांनी संगनमत करून सुरेखा बोरकर हिला विश्‍वासात घेतले. आठ ऑगस्ट रोजी दुपारी देहव्यवसायासाठी आपल्या दाभा येथील राहत्या घरी बोलाविले. चहामध्ये झोपेची गोळी मिसळवून दिली. त्यामुळे सुरेखा बोरकर हिला गुंगी आल्यानंतर दोघांनी तिचा गळा आवळून खून केला. वास येऊ नये म्हणून नाकात कापसाचे बोळे टाकून रात्री अकराला पल्सर दुचाकी (क्र. एमएच- 40/एई - 5510) वर दोघांनी आपल्या मधोमध बसवून वाडीमार्गे गोंडखैरी येथे नेले. टोलनाका दिसल्यामुळे रस्त्याच्या कडेला सुरेखाचा मृतदेह फेकून दिला. तिच्याजवळील बॅग जवळच्या नाल्यात फेकण्यात आली.

मोबाईल, दगिने विकले
सुरेखा हिच्या जवळचा सॅमसंग मोबाईल, बोटातील दोन आर्टीफिशियल अंगठ्या व गळ्यातील सोन्याचा गोफ स्वतःजवळ ठेवून घेतला. त्यानंतर कळमेश्‍वर येथे सोन्याचा गोफ विकून मुंबई, पचमढी या ठिकाणी पळून गेले. काही दिवसांनी आष्टा (मध्य प्रदेश) येथे कामधंद्यानिमित्त खोटे कारण सांगून निर्मला राऊत यांच्या सासरी आश्रय घेतला. गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी सावनेर येथील नातेवाइकाकडे ठेवली.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.