সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, July 08, 2012

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

वनसंसाधन संपत्तीचा अमूल्य ठेवा चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १० हजार ६८० चौ. कि.मी. असून त्यापैकी ४ हजार ४१५ चौ. कि.मी. क्षेत्रफळ विस्तार वनविभागाच्या ताब्यात आहे. महाराष्ट्रातील वनसंपदेचे वरदान लाभलेल्या मोजक्या जिल्ह्यांपैकी चंद्रपूर हा एक जिल्हा आहे. त्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हाही एक महत्त्वाचा मौलिक ठेवा आहे.

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे नाव हे स्थानिक आदिवासींच्या नावावरून पडल्याचे म्हटले जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या ताडोबातील सौंदर्य इंग्रजांनीही ओळखले. या जंगलातील वेगळेपणा त्यांना भावला आणि १९३५ मध्ये ताडोबा जंगलाची स्थापना झाली. १९५५ मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषणा झाली. १९८६ मध्ये अंधारी हा वन्यप्राणी उद्यानाचा भाग यात समाविष्ट करण्यात आला. ६२५.७४ चौ. कि.मी. चा परिसर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून १९९५ मध्ये राज्य शासनाने जाहीर केला. त्याला विदर्भाचे रत्नदेखील म्हणतात.

शक्ती आणि सौंदर्याचे प्रतिक असलेल्या व्याघ्र या विलक्षण प्राण्याचा येथे संचार असल्याने या प्रकल्पास राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. या प्रकल्पामध्ये वाघाशिवाय बिबट , गवा , सांबर , चितळ , रानडुक्कर हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. याबरोबरच येथे ४१ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती , १९५ पक्षांच्या प्रजाती , ७४ प्रकारांची फुलपाखरे , २६ प्रकारची कोळीवर्गीय कीटक ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी ५ प्रकारचे उभयचर प्राणी व २३ प्रकारचे मासे आढळतात. स्वर्गनर्तक , नवरंगी , खंड्या , कोतवाल , सातभाई , सुतार , सर्पगरुड , वेढा , राघ तीत , मोर , निलपंख व इतर अनेक स्थानीय व स्थलांतरित पक्षी येथे पहावयास मिळतात.

वाघ दिसण्याची हमी देणाऱ्या या व्याघ्र प्रकल्पातून बारमाही ताडोबा व कोळसा हे दोन तलाव तसेच अंधारी ही नदी प्रकल्पाचे मुख्य जलस्त्रोत आहेत. पर्यटकांसाठी येथे येण्याचा उत्तम काळ म्हणजे फेब्रुवारी ते मे पर्यंतचा मानला जातो. या काळात पर्यटक येथे मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवितात. हा प्रकल्प दर मंगळवारी बंद राहत असून पावसाळ्यात अलिकडे तो अंशतः सुरू राहतो. पर्यटकांना येथे येण्यापूर्वीच प्रकल्पात प्रवेशासाठी बुकींग करून ठेवणे गरजेचे आहे. चंद्रपुरातील ताडोबा व्यवस्थापनाच्या कार्यालयात याचे बुकिंग केले जाते. या प्रकल्पाला मोहुर्ली , पांगडी व कोलारा हे प्रवेशद्वार आहेत तेथून गाईडला घेऊन प्रकल्पात वाहनाने प्रवेश मिळतो. सकाळी ६ ते ११ तर दुपारी ३ ते ७ या वेळेत वाघ व अन्य वन्यजीव पर्यटकांना मुक्तदर्शन देत असतात. जंगल सफारी सोबतच इथे असणाऱ्या हत्तीवरून आपल्याला जंगलात सफारी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कसे जायचे

नागपूरपासून १४० कि.मी. अंतरावर ताडोबा असून उमरेड , भीसी व चिमूर मार्गाने येथे जाता येते. रेल्वेच्या दिल्ली-मद्रास मुख्य मार्गावरील चंद्रपूर रेल्वे स्टेशन असून चंद्रपूरपासून ४५ कि.मी. अंतरावर ताडोबा आहे. चंद्रपूरातून सहजतेने खाजगी , गाडी वा जिप्सी हायर करूनदेखील प्रकल्पात जाता येते.

कुठे राहाल ?

चंद्रपूरजवळील मोहर्ली मुख्यद्वारापाशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान असून आणखी ५ खाजगी निवासस्थाने आहेत. गर्दीमुळे येथील बुकींग आधीच करावे लागते. याव्यतिरिक्त खुंटवडा व कोलाराजवळ देखील पर्यंटकांना राहण्यासाठी निवासव्यववस्था होऊ शकते.

पर्यटकांना मार्गदर्शक सूचना

आपल्या व वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन हळू चालवा. त्यामुळे वन्यप्राणी दिसण्याची शक्यता जास्त राहील.
वन्यप्राण्यांच्या व पक्षांच्या सूचक आवाजाकडे लक्ष द्या व टेपरेकॉर्डर घरीच ठेवा.
प्रकल्पात कचरा टाकू नका.
भ्रमण करताना मार्गदर्शक सोबत ठेवणे आवश्यक आहे.

बाबांचे आनंदवन

चंद्रपूरपासून सुमारे ४२ कि.मी. अंतरावर असणारे समाजसेवक बाबा आमटे यांचे आनंदवन पर्यटकांसाठी सामाजिक सेवेचा अनमोल ठेवा ठरावा. येथे बसने सहज जाता येते. २१ जून १९५१ रोजी आनंदवनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते झाले. कुष्ठरुग्णांसाठी काम करण्यापेक्षा कुष्ठरुग्णांसोबत काम करण्याचे बाबांनी ठरविले. त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी १९८४मध्ये बाबांनी वनशेती संशोधनाचा प्रकल्प सुरू केला. मुक्तांगण सदनात कापड , सतरंजी , नॅपकीन अशा एका पेक्षा एक सरस वस्तूंचे तसेच १९७२ पासून टेलरिंग , प्रिंटींग , वेल्डिंग असे ६२ व्यवसाय सुरू आहेत. अनेक जण येथे हे सामाजिक काम पाहून मंत्रमुग्ध होतात. येथे युवक महारोग्यांपासून प्रेणा घेतील.

दत्तपूरच्या कुष्ठधामातून कुष्ठविमुक्त झालेले सहा कुष्ठबांधव , एक लंगडी गाय , साधनाताई , विकास , प्रकाश यांना सोबत घेऊन बाबांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली आणि ५० एकर जागेत मोठे समाजकार्य करून जगाचे लक्ष वेधले. थोर साहित्यिक पु.ल. यांनी १९६४ मध्ये प्रथमच आनंदवनात पाऊल ठेवल्यानंतर पु.ल.च्या निधनापर्यंत ३६ वर्षे आनंदवनाशी त्यांचे ऋणानुबंध होते. आनंदवनाचे ते एक अविभाज्य घटक होते. भाई आनंदवनात आले आणि अनेकांना आनंदवनाची माहिती मिळू लागली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ , श्रेष्ठ साहित्यकार व कलावंत आनंदवनाकडे वळू लागले.

आणखी काय बघाल

भ्रदावती - चंद्रपूरपासून ४५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या भद्रावती येथे भद्रनात मंदिर व पार्श्वनाथ मंदिर आहे. जवळच विशासन टेकडीवर बुद्ध लेणी आहे.
सोमनाथ - येथेही बाबा आमटेंचा एक प्रकल्प व दाट जंगलांनी वेढलेला धबधबा आहे

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.