चंद्रपूर -
सकाळी 11 चा लग्नाचा मुहूर्त. वधूपक्षाची मंडळी पहाटेच जागी झाली. जिच्या हाताला
हळद लागली होती ती "वधू' मात्र घरातून सकाळीच 5 वाजता निघून गेली. आयुष्यातील
महत्त्वाचा क्षण अगदी जवळ येऊन ठेपला असताना तिला मात्र तिच्या भविष्याचीही चिंता
होती. इकडे तिच्या घरच्या मंडळीची लग्नाची लगबग सुरू असतानाही ही "वधू' वनराणी
होण्यासाठी मेंदी लागलेल्या हाताने रानावनात चक्क 16 कि. मी. पायी चालत होती.
चंद्रपूर वनविभागामार्फत सोमवारी (ता. सात) वनपाल पदासाठी शारीरिक चाचणी घेण्यात आली. यात चंद्रपूर तालुक्यातील येरूर या गावाची जया गुलाब वैद्य ही 22 वर्षीय तरुणीही उमेदवार होती. जयाने अध्यापनशास्त्राचे धडे घेतले असून सध्या बीएससीच्या द्वितीय वर्गाला ती आहे. या चाचणीत 16 कि. मी अंतर चार तासांत कापायचे होते. जुनोना येथून सुरू झालेल्या या पायदळीत शेकडो युवती सहभागी झाल्या होत्या; मात्र यात जयाची गोष्टच वेगळी होती. कारण जयाचा आज भद्रावती येथील एका मंगल कार्यालयात अमोल झाडे या युवकाशी विवाह सकाळी 11 वाजताच्या सुमाराला होणार होता; परंतु वनपालाची परीक्षा आल्याने तिला इकडे यावे लागले. आपल्या वडिलांसोबत सकाळी पाच वाजता ती जुनोना येथे पोचली. लग्नाची घटिका जवळ येत असताना जीवघेण्या उन्हात तिने 16 कि.मी.चे अंतर वेळेच्या आधीच पार केले. त्यानंतर ती वडिलांसोबत लग्नमंडपात भद्रावती येथे रवाना झाली. दुपारी 2 वाजताच्या सुमाराला जया आणि अमोलच्या डोक्यावर अक्षतांसह मोठ्यांचे आशीर्वाद पडले. तिच्या भावी आयुष्याची घडी बसविताना लग्नघटिकेचा वेळ थोडा टळला; मात्र त्याचा आनंद वधू आणि वर दोन्ही पक्षांच्या चेहऱ्यावर दिसत होता.